१६७४ ला मराठा साम्राज्याचा दबदबा वाढतच होता. स्वराज्यात ३६५ किल्ले सामील झालेहोते. दख्खनचा राजा म्हणून शिवाजी महाराजांना पुरा हिंदुस्तान ओळखू लागला होता.त्याकाळी प्रजा शिवाजी महाराजांकडे हिंदुत्वासाठी लढणारी महान व्यक्ती म्हणून पाहत होती.
शिवाजीराजांनी अनेक जमिनींवर स्वामित्व स्थापन केले होते. त्यांच्याजवळ मजबूत लष्कर, नौदल आणि असंख्य सैनिकांवर त्यांचा हुकूम चालत असला तरी समाजातील सर्व वर्गातील लोक शिवाजी राजांना राजे मानत नव्हते.
हिंदू धर्मातील एक व्यक्ती छत्रधारी बनून तिने स्वतंत्र बाण्याने राज्य करीत रहावे अशी प्रजेची इच्छा होती. साहजिकच त्यासाठी हिंदू छत्रपतीची गरज होती. शिस्तबद्ध लष्कर व सुसंघटित प्रशासकीय यंत्रणेच्या बळावर छत्रपती शिवाजी महाराजांनी एक सामर्थ्यशाली आणि प्रागतिक राज्य उभे केले. आश्चर्यजनक वेगवान हालचाली आणि बलाढ्य शत्रूंचे मनोधैर्य खच्ची करणारे नेमके हल्ले यांचा वापर करणारे गनिमी काव्याचे तंत्र त्यांनी यशस्वीपणे वापरले. आपल्या वडिलांकडून मिळालेल्या २,००० सैनिकांच्या छोट्या तुकडीपासून एक लाख सैनिकांचे लष्कर छत्रपती शिवाजी महाराजांनी उभे केले. किनारी आणि अंतर्गत प्रदेशातील किल्ल्यांची डागडुजी करण्यासोबतच अनेक किल्लेही त्यांनी उभारले.
शिवरायांनी साहसाने, धैर्याने, कुशलतेने आपल्या वडिलांच्या छोट्या वतनदारीचा , स्वतंत्र अशा शक्तिशाली राज्यात रूपांतर केले होते . शत्रूवर वचक बसावा आणि स्वराज्याला सर्व राजे-रजवाडे यांनी मान्यता द्यावी म्हणून राज्याभिषेक करण्याचे ठरवले.
शिवरायांचा राज्याभिषेक होऊ नये म्हणून औरंगजेबाने प्रचंड प्रयत्न केले पण त्याला यश आले नाही.
राज्याभिषेकाची तयारी
गागाभट्टाच्या अनुमतीने राज्याभिषेक दिवस ठरला व राज्यात जोरदार तयारी सुरु झाली, राजे, जहागीर वतनदार, सरदार याना आमंत्रणे केली तर स्वराज्य सुरक्षेच्या कारणास्तव राज्यातील बाकीच्या किल्ल्यावर सतर्क फर्माने रवाने झाली. संपूर्ण स्वराजात आनंददायी वातावरण झाले.
देशभरातून येणाऱ्या अतिथींचे सोय व्हावी याकरिता राज्यात मोठ्या संख्येने सुंदर आलिशान विश्रामभवन, अतिथीगृह बनवले. राजधानी सुंदर दिसण्यासाठी नवीन तलाव, रस्ते , बाग-बगीचे, महाल बनवण्यात आले. राज्याभिषेकासाठी गागाभटांना आमंत्रित केले . या श्रीमंत सोहळ्यासाठी देशभरातून 11000 ब्राह्मण सहपरिवार उपस्थित राहिले. त्यांची संख्या जवळजवळ पन्नास हजार . चार महिने शिवरायांनी या पाहुण्यांची उत्तम सोय केली.
राज्याभिषेकच्या काही दिवस अगोदरच, आपल्या लाडक्या राजाचा सोहळा पाहण्यासाठी जनता रायगडावर येऊ लागली. सगळीकडे लगबग सुरु होती. गडावर सरदाराच्या घोडेस्वारांची रेलचेल वाढली. प्रत्येक मावळा आपल्या राजाच्या या सोहळ्यासाठी झोकून काम करत होता, त्यांच्यासाठी तर हे घरातीलच मंगल कार्यच होते. हा सोहळा पाहण्यासाठी हजारो स्त्री-पुरुष राजधानीत आले.
32मण सोन्याचे सिंहासन राज्याभिषेकासाठी घडविले. महाराज या सप्ताहात व्रतस्थ राहिले होते, खरे पाहता त्यांचे सारे आयुष्य व्रतस्थ होते, राज्याभिषेकाचे विधी दोन प्रकारचे. प्रथम विधी अभिषेकाचा.पंचामृत आणि सर्व गंगोदके यांचा अभिषेक, हा अभिषेक म्हणजेच राज्याभिषेक. हा विधी राजवाड्यात आतील भागात मोठ्या दालनात करण्यात येणार होता. या कार्यक्रमाला उपस्थिती राहणार होते अष्टप्रधान मंडळ, राज दरबारातील सरदार, नातलग. पण अभिषेकानंतर सिंहासनरोहण हा विधी सर्वांसाठी होता.
तिथीनुसार जेष्ठ शुद्ध त्रयोदशी शेक १५९६ त्यादिवशी वार होता शनिवार. इंग्रजी तारखेप्रमाणे हा दिवस होता ६ जून १६७४. हा दिवस मराठ्यांच्या इतिहासात नव्हे तर अखंड भारताच्या इतिहासातला अत्यंत महत्त्वाचा आणि गौरवशाली दिवस.
संपूर्ण राज्यात प्रत्येक घराघरासमोर रांगोळ्या काढल्या होत्या. या निमित्त राज्यात सणासारखेच वातावरण झाले होते.
शिवाजी राजांचा राज्याभिषेक होणार म्हणून जिजामातेला सर्वात जास्त आनंद झाला होता. शिवरायांच्या लहानपणीपासून जिजाऊंनी मनी बाळगलेले हिंदवी स्वराज्याचे स्वप्न आज पूर्ण होत होते, बाळ शिवबा. सिहांसनाधीश्वर म्हणजेच छत्रपती होणार होते.
पहाटे सुमारे तीन वाजल्यापासूनच या सोहळ्यास प्रारंभ झाला. मासाहेब जिजाऊ सर्व सोहळा पाहत होत्या.
राज्याभिषेकासाठी दोन फूट लांब दोन फूट रुंद अशा सोन्याने मढवलेल्या मंचावर. शिवाजी महाराज बसले, शेजारी उपरण्याला साडीचे टोक बांधलेली सोयराबाई दुसऱ्या मंचावर, तर बालसंभाजीराजे थोडेसे मागे बसले होते. अष्टप्रधानांतील आठ प्रधान गंगेसारख्या विविध नद्यांतून आणलेले जलकुंभ घेऊन उभे होते. त्यानंतर त्यांनी शिवाजीमहाराजांबर जलाभिषेक केला. त्या वेळी मंत्रपठण आणि मंगलवाद्य चालू होते. सोळा सुवासिनींनी पंचारती ओवाळली. यानंतर शिवाजी महाराजांनी लालरंगाचे वस्त्र परिधान करून , जडजवाहिर, अलंकार धारण केले.गळ्यात फुलांचे हार घातले. राजमुकुट घातला. ढाल तलवार आणि धनुष्यबाणाची पूजा केली. महाराजांनी मुहूर्ताच्या वेळी राजसिंहासनाच्या दालनात प्रवेश केला.
राज्यभिषेकाचे दालन हिंदू परंपरेनुसार ३२ शुभचिन्हांनी सजवले. सभासदबखर म्हणते त्याप्रमाणे ३२ मण सोन्याचे भव्य सिंहासन सोन्याच्या पत्र्याने मढवलेले होते. शिवाजी महाराज सिंहासनावर आरुढ झाले. ब्राह्मणांनी मोठ्या स्वरात मंत्रांचे उच्चारण केले. प्रजेने महाराजांना आशीर्वाद दिला. ‘शिवाजी महाराज की जय’, ‘शिवाजी महाराज की जय’ च्या घोषणा दिल्या गेल्या. सोन्याचांदीचे फुले उधळली गेली. विविध तालवाद्य सूरवाद्यांच्या जयघोषात आसमंत भरून गेले. ठरल्याप्रमाणे प्रत्येक गडावरूनतोफा डागल्या गेल्या. मुख्य पुरोहित गागाभट्टांनी पुढे येऊन राजांच्या डोक्यावर मोत्याची झालर ठेवत 'शिवछत्रपती’ म्हणून उच्चार केला. राजे शिवाजी महाराजांनी सर्व जनांना खूप धन भेट म्हणून दिले. त्यांनी एकून सोळा प्रकारचे महादान केले. त्यानंतर विविध मंत्रिगणांनी सिंहासनापुढे जाऊन राजांना अभिवादन केले. छत्रपतींनी त्यांना या प्रसंगी विविध पदे, नियुक्तिपत्रे, धन, घोडे, हत्ती,रत्ने,वस्त्रे,शस्त्रे दान केली. इंग्रज वकील, पोर्तुगीज प्रतिनिधी व इतर राजे,स्वस्थानिक व मोठे व्यापारी यांनी महाराजांना नजराणा अर्पण केला, राजांनी सर्वांचा योग्य सत्कार केला.
समारंभ संपल्यावर, शिवाजी महाराज पहिल्यांदा एका देखण्या घोड्यावर स्वार होऊन जगदीश्वराच्या मंदिराकडे गेले. तिकडून हत्तीवर स्वार होऊन त्यांची मिरवणूक रायगडावर निघाली. इतर दोन हत्तींवर जरीपटका आणि भगवे झेंडे घेऊन सैन्याचे प्रतिनिधी होते. सोबत अष्टप्रधान आणि इतर सैन्य होते. रायगडावर ही मिरवणूक जात असताना सामान्यजनांनी फुले, चुरमुर, उधळले, दिवे ओवाळले. रायगडावरील विविध मंदिरांचे दर्शन घेऊन महाराज महालात परतले.
शिवचरित्राचा सर्वात मोठा संदेश आहे महाराष्ट्र जगातील पहिले प्रजासत्ताक राज्य म्हणून घोषित झाले. शिवराई हे चलन जारी जारी केले.
सारा सोहळा आनंदात व वैभवात साजरा झाला. मराठ्यांचा स्वाभिमान या राज्याभिषेक
यामुळे वाढला गेला. शिवराय हिंदवी स्वराज्याचे पहिले छत्रपती झाले.
